फिनलँड सलग आठव्यांदा ठरला सर्वांत आनंदी देश   

फिनलँड : जागतिक आनंद दिनानिमित्त जगभरातील देशांचा ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या वेलबीइंग रिसर्च सेंटरने ’वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट २०२५’ सादर केला आहे. या अहवालात फिनलँड हा सलग आठव्यांदा सर्वात आनंदी देश म्हणून समोर आला आहे. यानंतर डेन्मार्क, आइसलँड आणि स्वीडन चौथ्या नंबरवर आहे. म्हणजेच नॉर्डिक देशांचे नागरिक जगात सर्वात आनंदी आहेत.’वेलबींग रिसर्च सेंटर’च्या या अहवालात नागरिकांच्या आनंदामागे केवळ आर्थिक सुबत्ताच नाही, तर नागरिकांचे परस्पर सहकार्य आणि समाजाचा सकारात्मक दृष्टिकोनही यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगण्यात आले. पण या अहवालात सर्वात आनंदी देशांसोबतच सर्वात दुःखी देशांच्या नावांचाही समावेश आहे. 
 
अफगाणिस्तान जगातील सर्वात दुःखी देश 
  
’वर्ल्ड हॅपीनेस लिस्ट २०२५’ मध्ये १५ देशांमध्ये आनंदाची पातळी घसरली आहे, तर केवळ चार देशांमध्ये सुधारणा झाली आहे. मात्र, या यादीत फिनलँडने सातत्याने सर्वात आनंदी देश म्हणून पुढे येत असताना, अफगाणिस्तान पुन्हा एकदा जगातील सर्वात दुःखी देश ठरला आहे. याबाबत अफगाण महिलांनी सांगितले, की अफगाणिस्तानात जीवन जगणे संघर्षमय झाले आहे. तसेच सर्वात दुःखी देशांच्या यादीत, सिएरा लिओन दुसर्‍या स्थानावर, लेबनॉन तिसर्‍या स्थानावर आहे.
 
अमेरिका, ब्रिटनची क्रमवारीत घसरण
   
अमेरिका हा जगातील सर्वात शक्तिशाली देश आहे, परंतु आनंदाच्या यादीत अमेरिकेचे स्थान घसरले आहे. या यादीत अमेरिकेसोबत ब्रिटनचेही नाव खाली आले आहे. आनंदाच्या पहिल्या २० देशांच्या यादीत समाविष्ट असलेली अमेरिका आता या यादीत आणखी खाली घसरली आहे. तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेतील वाढती सामाजिक विषमता, तणाव आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे येथील नागरिकांवर आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत आहेत. त्याचप्रमाणे ब्रिटनचीही क्रमवारीत घसरण झाली आहे. यावरून हे समजू शकते, की विकसित देशांच्या मोठ्या जीडीपीच्या आधारावर देशाची समृद्धी निश्चित केली जात नाही.

Related Articles